तब्बल 250 सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सोनसाखळी चोराला पकडण्यात पोलिसांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोर कितीही हुशार असला तरी पोलिस मात्र त्याचा शोध घेतल्याशिवाय थांबत नाही. अशाच एका सराईत सोनसाखळी आणि वाहन चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांनी फक्त जर्किन आणि हेल्मेटवरुन अटक केले आहे. त्याच्याकडून 7 लाख 13 हजार रुपये किंमतीच्या 5 सोनसाखळी आणि 6 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यासाठी पोलिसांनी 250 सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यासह सोने खरेदी करणाऱ्याला जेरबंद केले.

रूपेश प्रकाश यादव (वय 36, रा. वडगाव शेरी, मूळ-संभाजीनगर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. हलीम अलीम शेख (वय 40, रा. सय्यदनगर, हडपसर ) या सोनाराला पोलिसांनी जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडीतील मार्केटमध्ये भाजी खरेदी करताना 24 सप्टेंबरला एका महिलेची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली होती. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीने चंदननगर, अलंकार आणि विमाननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रूपेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शहरातील विविध भागातून 5 सोनसाखळी आणि 6 वाहने चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेले सोने तो हलीमला विक्री करीत असल्याचे सांगितले.

चोरी करण्यासाठी रूपेश एकाच प्रकारचे जर्किग आणि हेल्मेट घालत असल्याची बाब पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, विजय सावंत, दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, अझरुद्दीन पठाण, रिहान पठाण, किशोर दुशिंग, उत्तम गट, संदीप देवकाते, प्रपुâल्ल मोरे, शेखर खराडे, अनिकेत भिंगारे, सतीश मुंडे, विशाल गाडे, विनोद महाजन, संजय आढारी, प्रवीण भालचिम, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.

आंतरजिल्हा वाहनचोरी करणारे दोघे अटकेत

आंतरजिल्ह्यातील वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून 2 लाख 55 हजारांच्या 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या. रमेश लक्ष्मण चव्हाण वय 21 आणि मोहन एकनाथ निलवर्णे वय 20 अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाने केली.