
>> नवनाथ शिंदे
शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून दिवसरात्र प्राधान्य दिले जात आहे. मात्र, दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस पोलिसांना डोकेदुखीचा ठरत आहे. विशेषतः पादचारी महिला, रात्री-अपरात्री प्रवास करून आलेले नागरिक, कामावरून सुटलेल्यांना दुचाकीस्वार चोरट्यांकडून टारगेट केले जात आहे. सोनसाखळी चोरट्यांकडून पत्ता विचारण्याचा बहाण्यासह विविध कारणांनी नागरिकांची लुटमार केली जात आहे. मागील दोन वर्षांत शहरातील विविध भागात चोरट्यांनी सुमारे 3 कोटी रूपयांच्या 117 सोनसाखळ्या चोरून नेल्या आहेत. त्यामुळे नागरिक भीतीखाली वावरत असल्याचे दिसून आले आहे.
सोनसाखळी चोरट्यांच्या हैदोसामुळे सर्वसामान्य नारिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चोरट्यांनी विविध बहाण्याने नागरिकांची लुटमार केल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. हेल्मेट आणि मास्कधारी चोरट्यांकडून काही मिनीटांमध्ये चोरी केली जात आहे. दोन वर्षांत शहरातील विविध भागात चोरट्यांनी 117 सोनसाखळ्या चोरून नेल्या आहेत. त्यापैकी 80 सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सोनसाखळीचा 2 कोटी 90 लाख रूपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यापैकी 72 लाखांचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याशिवाय दोन वर्षात शहरात जबरी चोरीच्या 395 घटना घडल्या आहेत. त्यापैकी 315 घटना उघडकीस आणल्या आहेत. संबंधित घटनांमध्ये 3 कोटी 60 लाखांवर ऐवज चोरीला गेला आहे. त्यापैकी 1 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये जबरी चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. त्यामध्ये चोरीला जाणारा ऐवज कमी असल्याचे दिसून आले आहे.
उपनगरांसह कमी वर्दळीच्या ठिकाणांहून जाणाऱ्या नागरिकांना अडवून सोनसाखळीसह ऐवजाची लुटमार केली जात असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. रात्री-अपरात्रीच्या सुमारास नागरिकांना अडवून लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. चाकूच्या धाकाने नागरिकांना लुटणे, विनाकारण भांडण करून मारहाण करत नागरिकांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल हिसकावून नेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या रात्र गस्तीवर अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून रात्र गस्त अधिक कडक केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्वाच्या रस्त्यावर नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अशा घटनांना आळा बसल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाचे नाव अन चोरीचा डाव
कोरोनामुळे लॉकडाउनचा फटका अनेक कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी करण्यात आले. परिणामी नोकरी गमाविल्यामुळे आणि कामधंदा मिळत नसल्यामुळे काहीजणांनी कोरोनाच्या नावाखाली चोरी केल्याचे घटनांवरून दिसून आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वार चोरट्यांचे आहे. हेल्मेट आणि मास्क परिधान करून चोरी केल्यामुळे पोलिसांना तपासाला अडथळा निर्माण होतो. याची जाणीव चोरट्यांना असल्यामुळे त्यांनी खबरदारी घेउनच चोरी केल्याचे काही घटनांमध्ये निष्पन्न झाले आहे.
सोनसाखळी चोरी – सन घटना उघडकीस चोरी ऐवज जप्त ऐवज
- 2019 67 45 1 कोटी 84 लाख 42 लाख 59 हजार
- 2020 50 35 1 कोटी 7 लाख 30 लाख 61 हजार























































