
लक्ष्मीपूजन करण्यासाठी ठेवलेल्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला आहे. अर्धवट उघड्या खिडकीतुन आतमध्ये हात घालून चोरट्याने मुख्य दरवाजाची कडी उघडून 5 लाखांचे दागिने चोरून नेले. येरवड्यातील जयजवाननगर परिसरातील गुरूद्वारा रोडवरील घरामध्ये रविवारी पहाटे पावणे चार वाजता ही घटना घडली. याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे गुरूद्वारा रोड परिसरात राहतात. शनिवारी त्यांनी लक्ष्मीपुजनासाठी घरातील दागिने, रोख रक्कम बाहेर काढली होती. रात्री पुजा झाल्यानंतर त्यांनी दागिने, रोख रक्कम व पुजा तशीच ठेवली. त्यानंतर रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या अर्धवट उघड्या खिडकीतुन चोरट्याने आतमध्ये हात घालून मुख्य दरवाजाची आतील कडी उघडली. त्यानंतर मुख्य दरवाजातून आतमध्ये घुसलेल्या चोरट्यास समोरच लक्ष्मीपुजेसाठी ठेवलेले दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज दिसला. त्यानंतर त्याने ऐवज घेऊन पळ काढला. फिर्यादी यांनी सकाळी उठून पाहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. चोरट्याने फिर्यादी यांच्या परिसरातच राहणाऱ्या हरिष चौधरी यांच्या कश्मिरी कॉलनीतील कृष्णा स्वीट मार्ट या दुकानाचे शटर उचकटून दुकानाच्या गल्ल्यातील रोख चोरुन नेली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे करीत आहेत.



























































