भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादव विरुद्ध मोक्का, पूर्ववैमनस्यातून रचला होता बबलू गवळीच्या खुनाचा कट

पूर्ववैमनस्यातून हत्याची सुपारी देणार्‍या भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव आणि त्याच्या साथीदारांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत मोक्कानुसार कारवाई” केली आहे. विवेक महादेव यादव (वय 38 वर्षे रा. वानवडी) याने इतर तीन साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करून दुश्मन विष्णु उर्फ बबलु गवळी याचा खुन करण्यासाठी सराईत राजन जॉन राजमनी (वय 38 वर्षे, रा.भाग्योदयनगर, कोढवा) हुसैन उर्फ इब्राहिम याकुब शेख (वय 27, रा. वाकड पिंपरी चिंचवड) या दोघांना सुपारी दिली. त्यासाठी त्यांना पैसे आणि पिस्तुले देखील पुरवली होती.

पुणे कॅन्टोमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव आणि बबलु गवळी यांच्यात पूर्वीपासून दुश्मनी आहे. त्यातून बबलु गवळी याने 2016 मध्ये यादव याच्यावर गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे जामिनावर बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर विवेक यादव फरारी झाला होता. त्याच्या तपासासाठी वेगवेगळी तीन पथके शोध घेत होती. तो गुजरात बॉर्डरवर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गुजरात आणि राजस्थान बाँर्डरवर त्याला अटक केली होती. दरम्यान कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे कर्मचारी सुशील धीवर यांच्या पथकाने दोघांना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आणि मिळून आलेल्या व्हाट्सअप संभाषण दरम्यान विवेक यादव याने बबलू गवळीच्या खुनाचा कट असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. तपासादरम्यान विवेक यादव याने त्याचे साथीदार यांच्यासोबत मिळून संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असून वेळोवेळी टोळीमधील सदस्यांना बदलुन त्यांना बरोबर घेवुन बेकायदेशिर मार्गाने शरीराविरुध्दचे गुन्हे करून, स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध आर्थिक फायदा मिळविण्याच्या उददेशाने व त्याभागामध्ये आपल्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व राहावे या उददेशाने त्यांनी गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वारंवार वेगवेगळ्या टोळी सदस्यासोबत संघटीत रित्या केले आहेत.

तसेच टोळी प्रमुख यादव याने व त्याचे संघटीत टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवुन टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का ) या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या