शहरातील मध्यवर्ती असलेल्या एरंडवणे परिसरात सात ते आठजणांच्या टोळक्याने एका महिलेला शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या बंगल्यातील 50 हजार रुपये किमतीचे चंदन झाड कापून नेले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, टोळक्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 मे रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास जुन्या कर्नाटक हायस्कूलसमोर घडली.
फिर्यादी महिला 10 ऑगस्ट रोजी कुटुंबीयांसह बंगल्यात झोपली होती. त्यावेळी सात ते आठजणांच्या टोळक्याने त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांनी केलेल्या आवाज व गडबड गोंधळामुळे महिलेला जाग आली. त्यामुळे तिने दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता, टोळके हे त्यांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापण्याचा प्रयत्न करीत होते. महिलेने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्याने तिला शस्त्राचा धाक दाखवून शांत बसण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत महिलेने कोणालाही बोलावले नाही.
चोरट्यांनी 50 हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड कापून नेले. त्यानंतर काही वेळाने महिलेने तिच्या कुटुंबीयांना माहिती देत चोरी झाल्याचे सांगितले. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी खडकीत चंदन झाडाची चोरी
खडकीतील किर्लोस्कर कंपनीच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील चोरट्यास अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बिरनशी वैद्यनाथ मलिक (वय ५२, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रवण कुमार ऊर्फ लोटन राम (रा. बहिमर, हजारीबाग, झारखंड) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.