एस. टी. बसमध्ये जागा धरण्यासाठी जाणाऱया वृद्धेच्या गळ्याला एका भामटय़ाने धारदार चाकू लावून 50 हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना भरदुपारी घडल्यामुळे राहुरी बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये घबराट उडाली आहे.
हिराबाई म्हसू कल्हापुरे (वय 60) या रविवारी दुपारी श्रीरामपूर येथे जाण्यासाठी राहुरी बसस्थानकावर थांबल्या होत्या. नगर-श्रीरामपूर ही बस राहुरी स्थानकावर येताच, जागा धरण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका भामटय़ाने हिराबाई यांच्या गळ्याला चाकू लावला. तर या भामटय़ाबरोबर असलेल्या महिलेने हिराबाई यांचे दोन्ही हात पाठीमागून दाबून धरले. हिराबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून हा भामटा महिलेसह घटनास्थळावरून पसार झाला. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेल्या हिराबाई यांनी आरडाओरड केली. मात्र, बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असताना कुणीही मदतीला धावून आले नाही. या घटनेनंतर हिराबाई कल्हापुरे यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी बसस्थानकावर गेल्या तीन महिन्यांत महिलांचे पर्समधील पैसे, दागिने चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची लूटमार करणाऱया सराईत भामटय़ा महिलांची टोळी महिन्याभरापूर्वी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली होती. मात्र, धारदार चाकू गळ्याला लावून सोन्याचे दागिने लुटण्याची पहिलीच घटना राहुरी बस स्थानकावर घडल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अडीच तोळ्यांच्या दोन चेनची चोरी
गर्दीचा फायदा घेऊन दोघांच्या गळ्यातील चेन चोरटय़ाने चोरून पोबारा केला. हा प्रकार शहरातील पुष्पराज चौक ते राम मंदिर चौक या दरम्यान घडला. याप्रकरणी गोरख भीमराव पवार (सोनार) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोरख पवार हे कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळ राहतात. पवार आणि त्यांचे मित्र रोहन मुळीक हे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या शांतता रॅलीच्या निमित्ताने पुष्पराज चौकात आले होते. ते दोघे राम मंदिर चौक परिसरात आल्यानंतर त्यांना सोन्याची चेन चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन दोघांच्या चेन चोरी झाल्याची फिर्याद दिली.