सिंहगड रस्त्यावर दोघांना मारहाण करीत टोळक्याचा राडा, पाचजण अटकेत

तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगितल्याचा राग आल्यामुळे त्यांनी दोन तरुणांना मारहाण करून परिसरातील गाड्यांवर दगडफेक केली. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली. ओंकार प्रकाश राक्षे (वय 21), सुहास रघु गाडे (वय 23), कुणाल रवींद्र राशीनकर (वय 18), वैभव चंद्रकांत पवळे (वय 18, चौघे रा. वडगाव बुद्रुक), शाहू संजीवन देशमुख (वय 21,रा. आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आकाश जागडे (वय 21, रा. धायरी) याने यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात घडली

जागडे काल रात्री दहाच्या सुमारास मित्रासह सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातून निघाला होता. त्यावेळी भगवा चौक परिसरात गर्दी झाली होती. टोळक्यातील काहीजण एका तरुणाला मारहाण करत होते. त्यामुळे तेथे गर्दी जमली झाल्यामुळे जागडे आणि त्याचा मित्र आकाश पासलकरने टोळक्यातील काहीजणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने जागडे आणि पासलकर यांना मारहाण केली.

रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुचाकी खाली पाडून टोळक्याने दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. त्यानंतर टोळक्यातील काहीजण दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पसार झालेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धोत्रे तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या