डेक्कन कॉलेजच्या आवारातील विहिरीत सापडले पिस्तुल आणि 369 काडतुसे

शहरातील डेक्कन कॉलेजच्या आवारातील विहिरीतील गाळ काढत असताना एक गावठी कट्टा आणि तब्बल 369 काडतुसे सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. येरवडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कट्टा आणि काडतुसे जप्त केली.विहिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडून आल्याने पोलीसानी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अंकुश निकम यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकित डेक्कन कॉलेजच्या आवारात विहीर असून त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. त्यामुळे कॉलेजकडून विहिरीत गाळ काढण्याचे कंत्राट ठेकेदाराला दिले होते. कामगारांकडून विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना त्यातून एक गावठी कट्टा आणि वेगवेगळ्या आकाराचे बंदुकीमध्ये वापरले जाणारे काडतुसे भरलेली पिशवी सापडून आली . कामगार शामराव शिंदे याने तातडीने येरवडा पोलिसांनी घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून गावठी कट्टा आणि 369 काडतुसे जप्त केली. कॉलेजच्या आवारात विहिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडून आल्याच्या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपास सुरु केला आहे.काडतुसे कुठे निर्माण केल्या आणि त्याची ओळख पटविण्यासाठी लवकरच काडतुसे ज्ञान वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या