पुणे – हडपसरमधून दोन महिलांनी केले चिमुरड्याचे अपहरण

crime

आईसोबत पूलाखाली झोपलेल्या एक वर्षांच्या मुलाचे दोन महिलांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना हडपसरमध्ये घडली आहे. काही दिवसांपुर्वी चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अपहरणाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शर्मिला निलेश काळे (वय 22) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मूळच्या इंदापूर तालुक्यातील असून त्यांना दोन मुले आहेत. पतीसोबत वाद झाल्याने शर्मिला मुलांसह त्यांच्या ओळखीतील गाडीतळ पुलाखाली राहत असलेल्या महिलांकडे आल्या होत्या.

तेथील कुटूंबे मोलमजुरी करून उपजीविका चालवतात. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन महिलांनी शर्मिला यांच्याजवळ झोपलेला एक वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. काही वेळातच हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना उठवले आणि परिसरात शोध घेतला. पण तो मिळून आल्या नाही. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला आहे.

”पूलाखाली झोपलेल्या महिलेच्या ताब्यातील मुलाला दोन महिलांनी उचलून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यानुसार तपास सुरु असून आरोपींचा माग काढला जात आहे.” – बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या