मुंढव्यात ‘डॉग पार्कसाठी हालचाली सुरू

18

सामना प्रतिनिधी। पुणे

पुणे महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुंढवा परिसरात ‘डॉग पार्क’ उभारण्याच्या हालचालींना सुरुवात केली आहे. मुंढवा परिसरातील सहा एकर जमीन या पार्कसाठी मिळावी, यासाठी प्रस्ताव सरकारला पाठविण्यात येणार आहे.

मुंढवा परिसरात ‘डॉग पार्क’ करण्याच्या जागेवर गेल्या महिन्यात पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी गेले होते. मात्र, या सहा एकर जागेवर जनावरांच्या गोठ्याच्या पुनर्वसनासाठी शेड्स उभारण्यात आलेले आहेत. पालिकेला ही जागा ‘डॉग पार्कसाठी मिळण्यासाठी जमिनीच्या वापरात बदल (चेंज ऑफ युज) करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी जागा मिळाल्यानंतर तो प्रकल्प भागीदारी की पालिकेने स्वत: चालवायचा, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यप्रमुख रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

‘डॉग पार्क’चा पहिला प्रस्ताव स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्याम देशपांडे येथे 2008 मध्ये दिला होता. ‘डॉग पार्क’साठी त्यांनी बजेटमध्ये एक कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर (2012) नगरसेवक किशोर विटकर आणि शीतल सावंत यांनी सर्व छोट्या कुत्र्यांना एका छताखाली ठेवण्यासाठी विशेष जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरीही देण्यात आली होती. मात्र, निधीची कमतरता आणि जमिनीची अनुपलब्धता यामुळे हे पार्क कागदावरच राहिले होते.

‘डॉग पार्क’मध्ये कुत्र्यांना आरोग्यसेवा, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, लसीकरण आदींचा समावेश आहे. प्रत्येक कुत्राच्या देखभालीसाठी त्यांना दरवर्षी 18 हजार ते 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. शहरात 40 हजारांपेक्षा जास्त कुत्री आहेत. एका कुत्राला कमीत कमी 30 चौरस फूट जास्तीत जास्त 40 चौरस फूट जागा आवश्यक आहे. त्यामुळे ‘डॉग पार्क’साठी सात एकर ते जास्तीत जास्त 10 एकर क्षेत्राची आवश्यकता लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या