Video : सातारा रस्त्यावर कोयता गँगचा नंगानाच, तिघे जखमी

49

सामना प्रतिनिधी । पुणे

शहरात कायदा सुव्यस्थेचे तीन तेरा झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणातून नऊ जणांच्या टोळक्याने एका दुकानावर हल्ला केला. यात तिघे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर विशाल बबन भोसले (24), महेंद्र राजेंद्र नवले (21) आणि अक्षय दत्तात्रय कुरधोनकर ( 20) अशी जखमींचे नावे आहेत. विशाल भोसले याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पाच अल्पवयीन मुलांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विशाल भोसले याचा मित्र अमर गायकवाड याची डिसेंबर महिन्यामध्ये विकास कांबळे उर्फ थापा याच्यासोबत एकमेकांकडे बघण्यावरून भांडणे झाली होती. त्यावेळी काही जणांनी मध्यस्थी करून ही भांडणे मिटवली होती. मात्र, थापाला याचा सूड उगवायचा होता. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास विशाल आणि आणि अमर गायकवाड हे जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक 47 मध्ये बोलत उभे होते. त्यावेळी विकास कांबळे आणि त्याचे साथीदार गायकवाडला मारण्यासाठी हातामध्ये कोयते घेऊन येत असल्याचे त्याने पाहिले. गायकवाड स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तेथून पळू लागला. त्यावेळी कोयता फेकून मारल्याने विशाल भोसलेच्या करंगळीला मार लागला.

गायकवाड आणि भोसले हे सातार रस्त्यावर काळूबाई मंदीराजवळ लपले. त्यावेळी या टोळक्याने हातामध्ये कोयते घेऊन दुकानात घुसण्याचा प्रयत्न केला. पण एकाने दुकानात येण्यापासून या टोळक्याला रोकले. त्यांच्यावर उलट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळ हे हल्लेखोर दुकानात येऊ शकले नाहीत. यामध्ये दुकानाची काच फुटून नुकसान झाले. भर रस्त्यावर हा प्रकार घडत असल्याने एकच खळबळ उडाली, परिसरातील नागरिक घाबरून तेथून पळून गेले. काही वेळाने हे टोळके तेथून निघून गेले.

दत्तवाडी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नऊ पैकी 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यातील थापाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या