बेदरकारपणे मोटार चालवून दोघांचा बळी घेणाऱया कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना अटक केली होती. तपासात मकानदार आणि ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्यामध्ये मोठे आर्थिक सेटिंग असल्याचे उघडकीस आले आहे.
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी अश्फाक बाशा मकानदार (36, रा. धानोरी, विश्रांतवाडी), अमर संतोष गायकवाड (27, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांना मुंबई येथून बेडय़ा ठोकण्यात आल्या होत्या. यापूर्वी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, शिवानी अगरवाल, सुरेंद्र अगवाल यांना अटक झाली होती.
आरोपी मकानदारची भूमिका पहिल्यापासूनच संशयास्पद आहे. तो अवैध धंद्याशी निगडित असून, हुक्का पार्लरही चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबरोबरच तो अवैध धंद्यावरून पोलिसांसाठी पैसेही गोळा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातही त्याचा सहभाग आहे. रक्त बदलण्याचा प्रकार डॉ. तावरे आणि मकानदार यांच्यातील चर्चेतूनच झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.