पुणे बाजार समितीने पणन मंत्र्यांना दाखवला कात्रजचा घाट, मंत्र्यांचे आदेश झुगारून बाजारात पुन्हा टपरी थाटली

पुणे बाजार समितीमधील बेकायदा टपर्‍या, स्टॉल काढण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पावसाळी अधिवेशनात केली. त्यानुसार पणन विभागाकडून पत्रही समिताला आले. मात्र, पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाचे कारनामे थांबायचे नाव घेत नसून मार्केटयार्डात पुन्हा नव्याने भली मोठी टपरी टाकली आहे. बाजार घटकांना वाहतुकीस अडथळा होईल अशा शारदा गजानन मंदिरासमोर मोक्याच्या ठिकाणी टपरी टाकली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने पणनमंत्र्याना कात्रज घाट दाखवला आहे.

बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून फळे भाजीपाला, गुळ भुसार विभागात टपर्‍या पडत आहेत. आता नुकतीच फळे भाजीपाला विभागात जय शारदा गजानन गणपती मंडळासमोर एक भली मोठी टपरी पडली आहे. चार वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांच्या काळात वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या टपर्‍या हटविल्या होत्या. मात्र, आता संचालक मंडळ आल्यानंतर उलट अठा ठिकाणी टपर्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.यामुळे बाजारात वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीमुळे शेतमाल खरेदी करण्यास येणार्‍या व्यापार्‍यांना देखील त्रास होतो. कोंडीमुळे अनेकदा शेतमाल शिल्लक राहून शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचे वाहतुकदार सांगतात. मात्र संचालक मंडळाला याचे काही घेणे देणे नाही.

काय होते पणन मंत्र्यांचे आदेश
पावसाळी अधिवेशनात पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराचे वाभाडे निघाले होते. त्यावेळी पणन मंत्री रावल यांनी संचालक मंडळ कालावधीत वाटप केलेले स्टॉल, टपर्‍या दुकाने, गाळे, मोकळ्या जागा, पेट्रोल पंप रद्द कारणे, तसेच ठरावा द्वारे दिलेले कामे वाहन तळ, सुरक्षा एजन्सी, मनुष्य बळ पुरवठा इ. ठेके रद्द करण्याची घोषणा केली होती. यावर मात्र बाजार समितीने कोणतीही कारवाई केली नाही.

संचालक मंडळाच्या मागील बैठकीत बाजार आवारात कोणतीही टपरी न टाकण्याचा ठराव केला होता. तरीदेखील टपरी पडली. त्यामुळे सभापती मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत त्याचे हे उत्तम उदाहरण असून सभापती हे त्यांच्या ठराविक बगल बच्चे संचालकांमार्फत गैरकारभार करत आहेत.- प्रशांत काळभोर, संचालक, बाजार समिती, पुणे.