पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री 01.30 ते 1.35 च्या सुमारास पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोरील एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान कारने पहिल्यांदा दुचाकीवरील तिघांना धडक दिली. या घटनेमध्ये ते तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर पुढे आणखी एका दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रौफचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघात झाल्यानंतर कारचालकाने घटनास्थळातून पळ काढला. अपघात झालेल्या परिसरातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपीच्या कारचा नंबर काढण्यात आला, त्यानंतर त्या कारचालकाचा मोबाईल नंबर काढून त्यावरून पत्ता मिळवण्यात आला. आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर त्याची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कारचालकाचे नाव आयुष प्रदिप तयाल असून तो हडपसरचा राहणारा आहे.
याप्रकरणी आरोपी आयुष प्रदिप तयाल वर कलम 105,281, 125(a), 132 119, 177, 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर पुन्हा एकदा हिट अँड रनच्या वाढत्या घटनांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.