नाट्यफंदी शिलेदार! संगीत नाटय़ परंपरेचा खजिना उलगडणार

संगीत नाटक ही मराठी रसिकांच्या मर्मबंधातील ठेव आहे. नाटय़संगीताचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. गेली पाच दशके शिलेदार कुटुंबीयांनी ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या संस्थेमार्फत संगीत नाटकांची इमानेइतबारे शिलेदारी केली. सुरुवातीला ज्येष्ठ गायक नट जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार आणि त्यानंतर त्यांच्या कन्या कीर्ती आणि लता शिलेदार (दीप्ती भोगले)! संगीत नाटकांच्या या प्रदीर्घ प्रवासातील आठवणींचा अनमोल खजिना घेऊन शिलेदार भगिनी आज आपल्यासमोर आल्या आहेत. कीर्ती आणि लता शिलेदार यांनी यूटय़ूबवर ‘नाटय़फंदी’ ही नवीन मालिका सुरू केली आहे.

नुकताच यूटय़ूबवर ‘नाटय़फंदी’चा पहिला भाग अपलोड झाला आहे. यामध्ये संगीत नाटकाचे जनक अण्णासाहेब किर्लोस्कर यांना अभिवादन करून मालिकेची नांदी करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना कीर्ती शिलेदार म्हणाल्या, रंगमंदिरात सध्या आपली भेट होत नाही. नाटय़कलाकार म्हणून शांत बसवत नाही. म्हणून ही नवीन मालिका घेऊन तुमच्यासमोर येतोय. संगीत नाटकाच्या छंदाच्या सावलती आईनाना, मी आणि लता यांनी आपलं आयुष्य घालवलं. या प्रवासात अनेकांचे हातभार लागले. संगीत नाटकांनी काय दिले? त्यांचे बदलते रूप, आईनानांच्या सहवासात आलेले लोक, ही परंपरा जपण्यासाठी ज्यांचे हातभार लागले त्या सगळ्यांविषयी आम्ही ‘नाटय़फंदी’ मध्ये बोलणार आहोत.

लता शिलेदार (दीप्ती भोगले) म्हणाल्या, नाटय़फंदीच्या पहिला भागात आम्ही अण्णासाहेब किर्लोस्करांना वंदन केलं आहे. यानंतर नटी सूत्रधार, प्रस्तावना प्रवेश याची कल्पना देऊ. नाटक कंपनीचे बिऱहाडी स्वरूप सांगू. आमच्या कंपनीचं बिऱहाड महिनोन् महिने गावोगावी एकत्र असायचं. त्या दौऱयांचे अनुभव, जीवनपद्धती याविषयी येत्या भागांत माहिती देऊ. त्याकाळी नुकताच थिएटरमध्ये सिनेमा सुरू झाला होता. संगीत नाटकांसाठी आमच्या वडिलांच्या डोक्यात आले की आपण कापडी थिएटर करू. आम्ही ‘जयराम नाटय़मंदिर’ असं कापडी थिएटर उभं केलं. ते सर्कसच्या तंबूसारखं होतं. त्याबद्दलही ‘नाटय़फंदी’ मध्ये सांगू.

किर्लोस्करांची गादी

‘नाटय़फंदी’च्या पहिल्या भागात कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या गादीची पूजा करून त्याविषयी माहिती दिली. अण्णासाहेब किर्लोस्कर म्हणजे संगीत नाटकाचे जनक. महाराष्ट्रात नाटकाची खरी प्रतिष्ठापना अण्णासाहेबांकडून झाली. किर्लोस्करांच्या नाटक मंडळीत अनेक सुशिक्षित लोक जोडले गेले. त्यामुळे संगीत नाटकाला एकप्रकारे प्रतिष्ठा मिळाली. अण्णासाहेबांचे हे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यानंतरच्या सगळ्या नाटक कंपन्यामध्ये किर्लोस्करांची गादी तयार झाली. नाटक मंडळीत जेवढय़ा तालमी होत तेव्हा एक गादी स्वतंत्रपणे अण्णासाहेब किर्लोस्करांची म्हणून ठेवली जात असे. जणू काही ते उपस्थित आहेत असं समजले जाई. त्यांच्यासमोर तालीम मनःपूर्वक जाई.

आपली प्रतिक्रिया द्या