
पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम तोंडावर आला असताना, सर्वच राजकीय पक्षांची अवस्था तिकीट द्या रे बाबा, अशी झाली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. दोन दिवस उरले असताना, आजअखेर महायुती आणि महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. परिणामी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरलेल्या आज-उद्या दोन दिवसांत निवडणूक कार्यालयांमध्ये प्रचंड झुंबड उडण्याची चिन्हे आहेत.
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्जाची विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी आतापर्यंत अर्जाची विक्री दहा हजारांच्या पुढे गेली आहे. मात्र, प्रत्यक्ष दाखल झालेले अर्ज मोजकेच आहेत. ४१ प्रभागांतील १६५ नगरसेवकांच्या जागांसाठी इच्छुकांची रांग लागलेली असताना, पक्षश्रेष्ठींचे निर्णय मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांतच अर्ज भरण्याची अंतिम संधी असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये गर्दी, धावपळ आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळणार आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी निश्चित होणार, अशीच सध्याची परिस्थिती असल्याने इच्छुकांची झोप उडाली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत बैठका, सर्वेक्षणे, आघाडीची गणिते आणि स्थानिक समीकरणांवर चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चाचा फटका थेट इच्छूक उमेदवारांना बसत असून, तिकीट मिळणार की नाही, या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आहेत. अनेक इच्छुकांनी अर्ज भरून ठेवले असून, अंतिम निर्णयाची वाट पाहिली जात आहे. बंडखोरी उफाळू नये, यासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या याद्या तयार असूनही जाहीर न करण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रभागांमध्ये सातत्याने काम करत लाखो कोट्यवधी रुपये खर्च करणारे इच्छूक आता ऐनवेळी तिकीट हुकले तर काय करायचे, या चिंतेत सापडले आहेत.
‘एनओसी’साठी ३० डिसेंबर दुपारी १२ पर्यंतच संधी
निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असणारे थकबाकी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यासाठी महापालिकेने प्रथमच ऑनलाइन प्रणाली लागू केली आहे. https://nocelection.pmc.gov.in ही लिंक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महापालिकेच्या तब्बल ४१ खात्यांना जोडण्यात आले असून, उमेदवाराचा अर्ज एकाचवेळी सर्व खात्यांकडे ‘एनओसी’साठी पाठवला जाणार आहे. ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकृतीची लिंक सुरू राहणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत आलेल्या अर्जाना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, ३० डिसेंबर रोजी दाखल होणाऱ्या अर्जाना उशीर झाल्यास ‘एनओसी’ वेळेत न मिळाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदारांचीच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.



























































