बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार घोषित, अ‍ॅड आकाश मोरे यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केला आहे. अ‍ॅड. आकाश मोरे हे काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. येत्या 23 एप्रिल रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. आकाश मोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सूचनेनुसार आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे पत्रक काँग्रेसचे सरचिचणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध केले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पाच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी आकाश मोरे यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. आकाश मोरे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कळते. आकाश मोरे यांचे वडील अ‍ॅड. विजयराव मोरे हे विधान परिषदेचे आमदार होते.

जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे आकाश मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.