देशात बलात्कार आणि विनयभंगाचे वाढते प्रमाण पाहता स्त्रीयांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे. बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे लहान मुलींना सुद्धा स्वसंरक्षणाचे धडे देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयाने पुढाकार घेत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींना आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने Good Tuch आणि Bad Tuch वर आधारित मार्गदर्शन करण्यात आले.
शालेय जीवनात तसेच समाजात वावरताना काही वाईट अनुभव किंवा संकट आले तर स्वतःच संरक्षण कसं करायचे या संदर्भात कार्यशाळा आळंदीत उत्साहात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत मुलींना कठीण प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करायचे याचे धडे देण्यात आले. विद्यालयातील शिक्षिका सृष्टी वाघुले यांनी कराटेच्या माध्यमातून मुलींकडून काही प्रात्यक्षिके करून घेत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आळंदी पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकातील अंमलदार माया मोरे, हिरा तळपे व शितल दौंडकर यांनी या कार्यशाळेच्या निमित्ताने मुलींना गुड टच आणि बॅड टच याच्यातला फरक समजावून सांगितला. तसेच संकट समयी स्वसंरक्षण कसे करावे यावर प्रबोधन केले. शारदा साबळे यांनी मुलींना स्वतःची काळजी कशी घ्यावी व संकट काळात कोणाकडून मदत घ्यावी यावर माहिती दिली. या कार्यशाळेत अनुराधा वहिले, पूजा चौधरी, सुजाता गोगावले समवेत प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका, उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खेसे यांनी केले.