कर्जत पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याने महिला ग्रामसेवकाचा विनयभंग केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कर्जत येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजा आटकोरे यांनी कार्यालयातच महिला ग्रामसेवकाचा विनयभंग करण्याची घटना घडली आहे. अतिरिक्त ग्रामपंचायतीचा कार्यभार देताना कार्यालयात कोणी नाही, हे पाहून विनयभंग करण्याची घटना घडली आहे. या घटनेने महिला कर्मचाऱयांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याबाबत महिला ग्रामसेवकाने फिर्याद दिली आहे.
दि. 22 रोजी मासिक सभा असल्याने सकाळी महिला ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयात आल्या होत्या. पीडित महिला ग्रामपंचायत विभागाच्या कार्यालयात गेल्या. त्यावेळी विस्तार अधिकारी राजा अटकोरे हे कार्यालयात एकटेच होते. यावेळी पीडित महिलेने ‘मला घुमरी ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार देऊ नका’, अशी विनंती अटकोरे यांना केली. यावेळी अटकोरे याने अशी कामे पैशाशिवाय होत नाहीत; मात्र, तुमच्याकडून मी वेगळेच काहीतरी घेणार आहे’, असे म्हणत विनयभंग केला. यानंतर पीडितेने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. यानंतर त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. यावरून विस्तार अधिकारी अटकोरे याच्यावर गुन्हा दाखल केला.