
फोनवरून पत्नीशी वाद झाल्याने पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चिखली येथे घडली.
प्रतीक संदीप घनवटे (23) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. चिखली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी याबाबत माहिती दिली. प्रतीक यांची पत्नी गुजरात येथे होती. त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असत. प्रतीक आपल्या पत्नीला आणण्यासाठी गुजरातला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच पत्नीशी त्याचा वाद झाला. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी पतीने विषारी औषध प्राशन केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. पत्नीशी होत असलेल्या सततच्या वादातून आपल्या मुलाने विषारी औषध प्यायल्याचे त्यांच्या आईने पोलिसांना सांगितले. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
































































