
मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंगच्या जमीन विक्री प्रकरणी धर्मदाय आयुक्त यांच्यापुढे 28 तारखेला सुनावणी असल्याने, त्यावेळी पूजा केली जाईल. तसेच 29 तारखेला एक दिवसीय उपवास केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
आज जैन बोर्डिंग या ठिकाणी जैन संघटनांची बैठक झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत हे प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्यासोबत बैठक घ्यावी, जेणेकरून या जमिनीवरील गैरव्यवहाराची वस्तुस्थिती त्यांनाही कळेल. असा आग्रह जैन समाजाच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी धरला.
मोठे बिल्डर जाणूनबुजून जैन बोर्डिंगच्या या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजाच्या धार्मिक स्थळांवर ताबा मिळवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ट्रस्टींच्या चुकीच्या कारभारामुळे हे घडत आहे. असे प्रकार कुठेही घडू नयेत त्यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण पुढे आल्यानंतर जिह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आले नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. जैन मुनि आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांनी त्याबद्दल स्पष्टपणे मत नोंदविले.
जमीन मंदिराचा अहवाल सादर…
जैन बोर्डिंगच्या जमिनीची विक्री करताना त्यामध्ये या बोर्डिंगमध्ये जैन मंदिराचा उल्लेख केलेला नाही. तसेच जमिनीच्या विक्री व्यवहारा संदर्भात धर्मादाय आयुक्त यांनी पुण्याच्या सह आयुक्तांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन अहवाल पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जैन बोर्डिंग आणि जमिनीची पाहणी केली. बोर्डिंगची इमारत, मंदिर याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला असून तो मुंबईत धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीपूर्वी अहवाल सादर करण्याचे धर्मादाय आयुक्त यांचे आदेश होते.
अजित पवार आले नाहीत हे लाजिरवाणे…
जैन मुनी आचार्य श्री गुप्तीनंदीजी महाराज म्हणाले, केवळ जनप्रतिनिधी नव्हे, पुणे जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सर्वात प्रथम दखल घेऊन या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे होती. परंतु ते काही अद्याप पर्यंत आलेले नाहीत. हे अत्यंत खेददायक तसेच लाजिरवाणी गोष्ट आहे.




























































