
पुणे महापालिका निवडणुकीसाठी जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची युती फिस्कटली आहे. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा महाविकास आघाडीशी जुळवून घेत चर्चा सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत रास्ता पेठेतील शांताई हॉटेल येथे महाविकास आघाडीची बैठक सुरू होती. त्यामुळे पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासह समविचारी पक्ष भाजपविरोधात लढण्याची चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वपक्षीय आघाडी उभी हालचाली सुरू होत्या. त्यात पुणे महापालिकेत भाजपने अजित पवार गटबरोबर युती तोडत मैत्रीपूर्ण निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बैठकांचा जोर होता. मात्र, काँग्रेसने अजित पवार गटाशी युती नको अशी भूमिका घेतली. त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, शुक्रवारी दुपारी अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जागावाटपासाठी बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला केवळ ३५ जागा आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घालण्यात आली. घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट पक्षाचे अस्तित्व पणाला लावणारी असल्याने शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी युतीला नकार देत बैठकीतून बाहेर पडले. जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने युती फिस्कटल्याचे बोलले जात आहे.
हॉटेल शांताईमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबते
अजित पवार गटाशी बोलणी फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी तत्काळ थेट महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी संपर्क साधला. शांताई हॉटेल येथे तातडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची संयुक्त बैठक सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटपावर चर्चा सुरू होती. या बैठकीतून जागावाटपाचे कोणते नवीन सूत्र ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक आणि महापालिका निवडणूक समन्वयक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवक्ते अंकुश काकडे, माजी नगरसेवक विशाल तांबे, माजी नगरसेविका अश्विनी कदम, मनाली भिलारे, आमदार बापूसाहेब पठारे, तर काँग्रेसकडून शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अॅड. अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बागवे आदी उपस्थित होते.





























































