शहरातील बाल लैंगिक अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच पुण्यातही स्कूल व्हॅन चालकाने सहा वर्षीय दोन चिमुरडय़ांवर गाडीतच लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना 30 सप्टेंबरला उघडकीस आली असून, घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपीला वानवडी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. संजय जेट्टींग रेड्डी (45, वैदूवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पुण्यातील नामांकित शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणारा व्हॅनचालक संजय रेड्डी याने 30 सप्टेंबरला एका ठिकाणी व्हॅन थांबवून मुलीसोबत लैंगिक अत्याचार केले. मुलगी शाळेतून घरी आली असता, तिला त्रास होत असल्याचे आईला जाणवले. तिच्या अंगावर लालसर डाग पडल्याचे दिसून आले. आईने पीडित चिमुरडीला जवळ घेऊन विचारले असता, तिने स्कूल बसचालक संजय अंकल हा रोज घरी येताना अश्लील चाळे करत असल्याचे सांगितले. चार दिवसांपासून त्याने दुसऱ्या एका मैत्रिणीबरोबर असे केल्याचे मुलीने आईला सांगितले.
व्हॅनचालकाने केलेल्या या कृत्याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवधर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
वानवडीमध्ये स्कूल बसचालकाने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला आहे. या प्रकरणात आरोपी चालकास कठोर शिक्षा देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासोबतच संबंधित संस्थाचालकाची चौकशी केली जाणार आहे.
z देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री, महाराष्ट्र
वानवडी परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली. ही घटना अतिशय धक्कादायक असून दुर्दैवी आहे. घटनेतील आरोपीवर फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवून कठोर कारवाई करण्यात यावी. स्कूल बस आणि त्यांची सुरक्षा यांच्याबाबतीत शासनाने निश्चित धोरण तयार करण्याची गरज आहे.
z सुप्रिया सुळे, खासदार
अल्पवयीन शालेय मुलींवर स्कूल बस व्हॅनचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराच्या कलम 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीलाही तत्काळ अटक केली आहे.
z आर. राजा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5