पुण्यात बांधकामे, रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील धरणामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे विविध बांधकामे, रस्त्यांची कामे तसेच वॉशिंग सेंटर्ससाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यासाठीचे परीपत्रक पुणे महापालिकेने काढले आहे. अशा कामांसाठी मैलापाणी प्रक्रिया केंद्रातील शुद्ध केलेले पाणी वापरण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका प्रश्नावरील लेखी उत्तरात दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान खात्याने जाहीर करूनही प्रत्यक्षात पाऊसच नसल्याचे चित्र कोल्हापूर, सांगली आणि साताऱयात दिसून येत आहे. यंदा रोहिणी, मृग नक्षत्रे कोरडीच गेली असून, आर्द्रा नक्षत्रही कोरडे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

‘राज्यात मान्सून दाखल झाला असून मुंबई आणि कोकणात येत्या दोन ते तीन दिवसांत पसरेल. रत्नागिरीत आज सकाळी चांगला पाऊस झाला. संपूर्ण राज्यांत मान्सून पोहोचायला आणखी पाच दिवस लागणार आहेत.’
– कृष्णानंद होशाळीकर, (उपसंचालक, कुलाबा वेधशाळा)

मुंबई, कोकण मान्सूनचे वितरण व्यवस्थित सुरू आहे. मान्सूने महाराष्ट्र व्यापलेला आहे. मात्र, 30 जूनपासून मान्सून चांगला जोर धरेल. दिवसा कडक ऊन आणि संध्याकाळी विजांच्या कडकडाटात पाऊस होईल अशी स्थिती आहे.
– अनुपम कश्यपी
(पुणे वेधशाळा प्रमुख)