पत्नीला व्हिडीओ कॉल करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

खासगी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने दुचाकीचे हप्ते थकल्याचे सांगत मारहाण करीत जबरदस्तीने दुचाकी नेल्याने मानसिक धक्का बसलेल्या एकाने पत्नीला व्हिडीओ कॉल करीत गळफास घेत आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील चिंबळी येथे  मध्यरात्री घडला.

माधव हनमंत वाघमारे (वय32, रा. बर्गेवस्ती रोड, चिंबळी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. माधव यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून 2022 मध्ये कर्ज घेतले होते. कर्जाच्या हप्त्याची तो नियमित परतफेड करीत होते.6 जुलै रोजी माधव रांजणगाव येथे कामानिमित्त गेले असता तिथे येऊन फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने कर्जाचा हप्ता नेला. मात्र,17 जुलै रोजी कंपनीचा प्रतिनिधी पुन्हा रांजणगाव येथे गेला. तुमचे कर्जाचे तीन हप्ते थकले आहेत, तुम्ही आताच 49 हजार रुपये भरा, असे सांगितले. तसेच, माधव यांना मारहाण करून त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेला.

आपली दुचाकी नेल्याचा मानसिक धक्का माधव यांना बसला. याबाबत त्यांनी वेळोवेळी पत्नी आणि भावाला सांगितले. रक्षाबंधन व इतर काही कार्यक्रमानिमित्त भाऊ, पत्नी, मुले लातूर येथील आपल्या गावी गेले होते.14 ऑगस्ट रोजी रात्री माधव यांनी पत्नीला व्हिडीओ कॉल करीत आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न भाऊ व पत्नीने केला. भावाने पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून ही हकिगत सांगितली. नियंत्रण कक्षाने आळंदी पोलिसांशी संपर्क साधला. आळंदी पोलीस तातडीने त्यांच्या घरी गेले. दरवाजा तोडला असता माधव हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

” खासगी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने दुचाकीचे हप्ते थकल्याचे सांगत मारहाण करीत दुचाकी ओढून नेल्याने माधव यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, यासंदर्भात कोणीही तक्रार देण्यास आलेले नाही. सध्या अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांची तक्रार आल्यास पुढील कारवाई केली जाईल.