
पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील ब्रिटीशकालीन वास्तूच्या नुतनीकरणामुळे विविध विभागांना आता पुणेरी साज मिळाला आहे. त्यामुळे तब्बल 112 वर्ष जुन्या असलेल्या वास्तूने कात टाकली आहे. मुख्यालयातील इतिहासाचा समृद्ध वारसा असलेल्या इमारतीचा बाज जपण्यात आला आहे. त्यानुसार त्याच ढाच्यावर नव्याने साज चढविण्यात आल्यामुळे वर्षानुवर्षे अडगळीत पडलेल्या अनेक विभागांचे रूपडे पालटले आहे.
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये इतिहासकालीन वास्तुंचे संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जाते. त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाने मुख्यालयातील तब्बल 112 वर्ष जुन्या ब्रिटीश कालीन इमारतींच्या मुळ ढाच्यात बदल न करता नुतनीकरण केले आहे. त्यामुळे वास्तूची शोभा वाढण्यास मदत झाली आहे. मुख्यालयातील इमारतीची उभारणी साधारणपणे 1908 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाकडून ऋतूमानानुसार किरकोळ डागडुजी वगळता त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. विशेषतः प्राचीन वास्तू टिकविण्यासाठी भर देण्यात आला होता. मात्र, पोलीस मुख्यालय पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून येणाऱ्या अधिकाऱ्यांसह पर्यटकांना ब्रिटीशकालीन वास्तूचे जसेच्या तसे दर्शन व्हावे यासाठी नुतनीकरण आणि सुशोभिकरणाद्वारे ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
वर्षानुवर्षे जीर्ण अवस्थेत असलेल्या पोलीस मुख्यालयातील ब्रिटीशकालीन वास्तूचा नुतनीकरणाद्वारे बाज जपण्यात आला आहे. त्यानुसार इमारतीच्या विविध ढाच्यावर नव्याने साज चढविण्यात आला आहे. विशेषतः वायलेस विभाग, पोलिस खेळाडूंनी जिंकलेल्या ट्रॉफीज ठेवण्यासाठी असलेले ठिकाण, अधिकारी बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विभागात कोणतेही बदल केले नाहीत. स्थापत्य शास्त्रानुसार इमारतीच्या नुतनीकरणात अनेक अडथळे निर्माण झालेले असतानाही, त्यामध्ये ऐतिहासिक बारकावे जतन करण्याचा प्रयत्न पोलीस मुख्यालय प्रशासनाने केला आहे. इमारतीचा वारसा टिकविण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या टीमने काम केले आहे.
तब्बल 100 वर्ष जुन्या झाडांचेही संवर्धन
इमारतीप्रमाणेच परिसरातील झाडांचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. तब्बल 100 वर्षे जुन्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी दुरूस्ती करण्यात आली आहे. झाडांभोवती चौकोनी बांधकाम करण्यात आले आहे. त्याशिवाय ग्लोरीरूमद्वारे पुणे शहर पोलिस दलातील गौरवशाली इतिहास जपण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयातील ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीचे नुतनीकरण आवश्यक होते. त्यानुसार तत्काळ इमारतीच्या नुतनीकरणाला गती देण्यात आली. इमारतीचा मूळ ढाचा न बदलता दुरूस्ती, रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामध्ये ग्लोरीरूम, वायरलेस रूम, अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्यालये, परिसरातील झाडांचे मोठ्या प्रमाणावर जतन करण्यात आले आहे.
डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त, प्रशासन
































































