
महाविद्यालयातील विद्यार्थिनीला धाक दाखवून प्राचार्यांविरुद्ध अपहरणाची तक्रार करायला सांगून शिवाजीनगर पोलिसांनी 7 लाखांची खंडणी उकळली आहे. प्राचार्याला पोक्सोच्या गुह्यात अडकवण्याची भीती दाखवून पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, मार्शल सोनाली हिंगे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे यांनी खंडणी उकळली असून, त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व जण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. उपनिरीक्षक बडे हे आता सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दामिनी मार्शल सोनाली हिंगे रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. ही घटना 18 ते 28 जुलै 2025 कालावधीत घडली आहे. मुलीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी याची माहिती दिली. आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले.



























































