
बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर असल्याचा आरोप करत कारगिल युद्ध लढलेल्या माजी सैनिकाच्या घरात घुसून नागरिकत्वाचे पुरावे मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
26 जुलै रोजी रात्री पुण्यातील चंदननगर भागात ही घटना घडली. काही संघटनांचे 25 ते 30 लोक घोषणाबाजी करत माजी सैनिक हकीमुद्दीन शेख यांच्या घरात घुसले. त्यांनी शेख कुटुंबीयांना बांगलादेशी म्हणून हिणवत हिंदुस्थानी नागरिक असल्याची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. साक्षीदार शशाद शेख (35) यांच्या घरात शिरून त्यांना पॅनकार्ड दाखविण्यासाठी शिवीगाळ केली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी खुशल पवार, शांताराम कावरे, गणेश खवणे, सुरज जाधव, गणेश शिंदे, साईराज पवळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
सैनिक असूनही संशय का?
‘सैन्याच्या 269 इंजिनीयर रेजिमेंटमध्ये 1984 ते 2000 अशी 16 वर्षे मी सेवा बजावलीय. कारगिलच्या युद्धात देशासाठी लढलो. मग आम्हाला नागरिकत्व सिद्ध करण्यास का सांगितले जात आहे?’ असा सवाल हकीमुद्दीन शेख यांनी केला.