ट्रेंड – अन्न वाया घालवाल तर…

अन्न कधी वाया घालवू नये, अन्नाची नासाडी करू नये, असे आपल्याला शिकवलेले असते. मात्र तरीही आपल्या हातून बऱ्याचदा अन्न वाया जाते. विशेषतः हॉटेलमध्ये गेल्यावर आपण विविध पदार्थ मागवतो आणि त्यातील काही पानात टाकून निघून जातो. अशा लोकांसाठी पुण्यातील एका रेस्टॉरंटने अनोखा फंडा शोधलाय. या रेस्टॉरंटच्या मेन्यूचा फोटो सध्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून मोठय़ा प्रमाणात शेअर केला जातो आहे. एक ग्राहक पुण्याच्या या रेस्टोरंटमध्ये खायला गेला होता. यादरम्यान त्याचे लक्ष मेनू बोर्डच्या फोटोमध्ये रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध खाद्यपदार्थांची यादीकडे गेले. पण, या सगळ्या मेन्यूमध्ये लक्ष वेधून घेणारी तळाशी लिहिलेली एक ओळ होती. ज्यामध्ये ‘अन्न वाया घालवल्याबद्दल तुम्हाला 20 रुपये जास्तीचे द्यावे लागतील’ असे लिहिण्यात आले होते. ग्राहकाने या सूचनेचा फोटो @rons1212 या एक्स अकाऊंटवरून शेअर केलाय.