सोसायटय़ांचे ‘लॉकडाऊन’ बेकायदेशीर, कोणालाही परस्पर निर्बंध लादता येणार नाहीत; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोसायटय़ांनी प्रवेशासंदर्भात तसेच मोलकरीण, घरकामगार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांच्यासाठी स्वतःचे नियम करून निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध पूर्णपणे बेकायदेशीर ठरवत स्वतःचे नियम करून असे निर्बंध घातल्यास संबंधित सोसायटीवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.

शहरातील अनेक सोसायटय़ा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परस्पर विविध नियम व निर्बंध घालत आहेत. अनेक घटकांना सोसायटीमध्ये प्रवेश करण्यास मज्जावदेखील केला आहे. याबद्दलच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी सोसायटय़ा आणि रहिवासी क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश काढले. प्रशासनाने कोरोनाविषयक लागू केलेल्या नियमांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही परस्पर असे निर्बंध आणता येणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिल केले आहे. सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सोसायटय़ा खबरदारी म्हणून परस्पर अनेक निर्बंध घालत आहेत. यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यास त्या कुटुंबावर बहिष्कार घालणे, अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्स यांना त्यांच्या कुटुंबीयास त्रास होणे, मोलकरीण, घर कामकार, नातेवाईक व अत्यावश्यक सेवेतील इलेक्ट्रिशियन, प्लंबर यांना सोसायटीमध्ये येण्यास प्रतिबंध घातले जात आहेत. या संदर्भात अनेक तक्रारी प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून लोक करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोसायटय़ांनी प्रशासनाच्या आदेशाव्यतिरिक्त लागू केलेले सर्व निर्बंध आणि नियम बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. ज्या सोसायटय़ा असे निर्बंध घालतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोसायटय़ांनी नागरिकांना मास्क घालणे, औषधफवारणी, सोसायटी निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटाझरचा वापर, सोसायटीतील वयोवृद्ध, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी अशा स्वरूपाच्या विविध उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

सोसायटय़ांमध्ये प्रवेशासाठी अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, प्लंबर इलेक्ट्रिशियन नर्स, डॉक्टर ज्यांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. मोलकरीण, घरकामगार यांनाही प्रवेशासाठी निर्बंध घातले जातात. सोसायटय़ांमधील रहिवाशांची परवानगी असेल तर अशा प्रकारची अडवणूक सोसायटय़ांना परस्पर नियम करून करता येणार नाही.
डॉ. जयश्री कटारे,निवासी उपजिल्हाधिकारी