धक्कादायक! कात्रज प्राणी संग्रहालयात भटक्या कुत्र्यांनी केली चार हरणांची शिकार

पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात रात्रीच्यावेळी भटक्या कुत्र्यांनी प्राणी संग्रहालयात प्रवेश करून चार हरणांची शिकार केली. रात्रीच्यावेळी प्राणिसंग्रहालयात प्रवेश केलेल्या कुत्र्यांनी हरणांचा कळप असलेल्या खंदकात घुसून दोन नर आणि दोन मादी अशा एकूण चार हरणांची शिकार केली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात एक हरीण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे प्राणी संघटनांनी रोष व्यक्त केला आहे.

हरणांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राणीसंग्रहालयातील सुरक्षारक्षकांनी हरणांचा कळप असलेल्या खंदकाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत कुत्र्यांनी चार हरणांचा फडशा पाडला होता. त्यानंतर या कुत्र्यांना डॉग स्कॉडच्या मदतीने पकडण्यात आले आहे. कात्रज गावठाण परिसरातील ओढ्याचे काम सुरू असताना सुरक्षितता न बाळगल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्याठिकाणी लावण्यात आलेला पत्रा उचकटून भटक्या कुत्र्यांनी प्राणी संग्रहालयात प्रवेश केला. त्यानंतर जवळच असलेल्या खंदकातील हरणांच्या कळपावर हल्ला चढवला. त्यामध्ये चार हरणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक हरीण गंभीर जखमी झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या