शेवग्याची चिक्की, हळदीचे चॉकलेट, पुण्यातील प्रमोद पानसरे यांचा हेल्दी फूड्सचा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलीकडच्या वर्षांत लोक हेल्दी प्रोडक्टबाबत जागरूक झाले आहेत. अशा प्रोडक्टना बाजारात चांगली मागणी आहे. म्हणूनच या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जात आहेत. शेवग्याच्या पानांपासून पौष्टिक चिक्की आणि हळदीचे चॉकलेट तसेच राजगिऱयाचा खाकरा असा भन्नाट प्रयोग पुण्याच्या प्रमोद पानसरे या तरुणाने यशस्वी करून दाखवलाय. अल्पावधीतच कल्पकता, नावीन्यतेच्या जोरावर प्रमोद पानसरे यांनी फूड इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रमोद पानसरे हे शेतकरी कुटुंबातील. 2012 साली त्यांनी फूड टेक्नॉलॉजीत बी.टेक. केले. त्यानंतर एका फूड कंपनीत काम करायला सुरुवात केली. तिथे त्यांना वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती प्रक्रिया जाणून घेता आली. शेवग्यामध्ये खूप पोषणमूल्य असते, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्याचदरम्यान त्यांनी शेवग्याच्या पानांची पावडर बनवायला आणि विकायला सुरुवात केली. शेवग्याच्या पानांच्या पावडरीबद्दल त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र लोक या पावडरचा मर्यादित वापर करत असल्याने घरी नेलेली पावडर संपायची नाही. त्यामुळे पावडरीच्या विक्रीला उठाव मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी पावडरीऐवजी थेट उत्पादनेच करायचे ठरवले.

2018 साली प्रमोद पानसरे यांनी नोकरी सोडली. मार्पेट रिसर्च केला. वरद फूड्सची स्थापना करून ऑक्टोबर 2019पासून खाकरा बनवणे सुरू केले. त्यांना 1 जानेवारी 2020ला खाकऱयाची पहिली ऑर्डर मुंबई ग्राहक पंचायतकडून मिळाली. ती ऑर्डर पूर्ण केल्यानंतर लगेच लॉकडाऊन लागलं. कोरोना काळात लोक आरोग्य, प्रतिकारशक्ती याबाबत जास्त सजग झाले. याचा वरद फूड्सला फायदा झाला. शेवग्याच्या पानापासून बनवलेली चिक्की आणि गव्हापासून, राजगिऱयापासून बनवलेला खाकरा यांची मागणी वाढली. वरद फूड्समध्ये आज 12 ते 14 महिला काम करतात. अनेक शहरांमध्ये ऑनलाईन माध्यमातून या प्रोडक्टची विक्री केली जात आहे. लवकरच वेबसाईट सुरू करून उत्पादनांची विक्री वाढवण्याचा विचार प्रमोद पानसरे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला.

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवा

कोरोनाच्या काळात मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. मुलांना चॉकलेट खायला आवडतात. कोरोना महामारीत सर्वात गुणकारी म्हणून हळदीकडे बघितले गेले. म्हणूनच प्रमोद पानसरे यांनी हळदीमधील औषधी गुणधर्म असलेल्या कुरकुमीनपासून चॉकलेट बनवायला सुरुवात केली. हळदीचे कुरकुमीन, काळी मिरी अर्क, विलायची अर्क आणि आले अर्क यांचा वापर करून त्यांनी पौष्टिक चॉकलेट तयार केली.