‘एक्प्रेस-वे’वर आता वाहने अधिक सुसाट

88

सामना प्रतिनिधी। पुणे

पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस-वे’वर चारचाकी वाहनाच्या ताशी कमाल वेगमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. चारचाकी कारसाठी ताशी 80 किलोमीटरवरुन 120, बसेससाठी 100 आणि मालवाहू वाहनांसाठी 80 किलोमीटरपर्यत वेग वाढवण्यास रस्ते विकास महामंडळ प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता पुर्वीपेक्षा अधिक वेगाने वाहन पळवता येणे शक्य आहे.

नवीन नियमानूसार वाहनांचा वेग

वाहन प्रकार वेग (प्रतितास)

चारचाकी (कार) 120 कि.मी.

बसेस 100 कि.मी.
मालवाहू वाहने 80 कि.मी.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची वेग मर्यादा वाढीसंदर्भातील अधिसूचनेनूसारच सध्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. नव्या नियमानुसार आता चारचाकी वाहनांना ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहन चालवणे शक्य आहे. असे पु्ण्याचे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी म्हटले आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने रस्त्यांची चार गटामध्ये वर्गवारी केली आहे. त्यामध्ये ‘एक्स्प्रेस-वे’, चार किंवा त्यापेक्षा अधिक लेनचे महामार्ग, नगरपालिका हद्दीतील रस्ते आणि अन्य रस्त्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रालयाने एप्रिल 2018 रोजी काढलेल्या आदेशानुसार, ‘एक्स्प्रेस-वे’कर खासगी कार आणि चालक व आठ प्रवासी क्षमतेच्या वाहनांना 120 किमी आणि चालक व नऊपेक्षा अधिक प्रवासी क्षमतेच्या वाहनांना 100 किमी प्रतितास आणि मालवाहू वाहनांसाठी 80 किमी वेग मर्यादा निश्चित केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रालयाने आदेश काढल्यानंतरही ‘एमएसआरडीसी’ने ‘एक्स्प्रेस-वे’वर कमाल वेग मर्यादा पूर्वीप्रमाणेच 80 एवढीच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ‘एक्स्प्रेस-वे’वर मोठ्या संख्येने होणारे अपघात आणि अतिवेग हे या अपघातांमागील महत्वाचे कारण असल्याने येथील वेगमर्यादा वाढविण्यात आली नव्हती मात्र, आता या वेगमर्यादा वाढीला मंजुरी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या