
ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या धावत्या कारवर दगड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंडेथर गावच्या हद्दीत आज सकाळी हा अपघात झाला. डोंगरावरून एक दगड घसरत आला आणि थेट कारवर आदळला. दगडाचा वेग इतका होता की कारचे सनरूफ तोडून तो महिलेच्या डोक्यात कोसळला. या दुर्घटनेत स्नेहल गुजराती गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
स्नेहल गुजराती या कुटुंबासह पुण्याहून मानगावच्या दिशेने जात होत्या. त्यांची कार ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळ आली असता डोंगरातून कोसळलेल्या दरडीमधून आलेला दगड कारवर आला. हा दगड सनरूफ तोडून आत गेला आणि स्नेहल यांच्या डोक्यावर कोसळला. यामध्ये महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपुऱ्या उपाययोजना
दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळल्याचे बोलले जात आहे. घाटात नागमोडी वळणे असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांत असंख्य अपघात झाले आहेत.
 
             
		




































 
     
    





















