वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर जसे ट्रफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा. वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे परिस्थिती कळेल, अशा शब्दांत पुण्यातील एका महिलेने थेट राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांना सुनावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील काही भागांत पाहणी दौरा केला. सकाळी 6 वाजता मुंढवा केशवनगर या उड्डाणपूल आणि मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळाची देखील पाहणी केली. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असता अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर अजित पवार यांनी तात्काळ पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन करत हडपसर गाडीतळाला यायला सांगितले.

पर्रिकर कोण?

n आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहेत. मात्र जसे पर्रीकर दिवसा ट्राफिक बघण्यासाठी फिरायचे तसे तुम्ही कधीतरी ट्राफिकचा टाइम असतो, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही अडचणी सांगणार असं व्हायला नको. न सांगता व्हिजिट देत जा. म्हणजे तुम्हाला खरी परिस्थिती कळेल, असे एका महिलेने यावेळी अजित पवारांना सांगितले. त्यावर पर्रिकर कोण, असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच मी प्रश्न विचारायला आलेलो नाही, सगळ्या समस्या सोडवल्या जाव्या यासाठी प्रयत्न करतोय, असे अजित पवारांनी सांगितले.