येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोनाग्रस्त कैद्यांचे पलायन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात कैद्यांसाठी सुरू केलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह’ कैद्यांनी पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी मध्यरात्री एक वाजता घडला आहे. कैदी पळून जाण्याच्या चौथ्या घटनेमुळे तात्पुरत्या कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यावरुन कारागृह प्रशासन आणि येरवडा पोलिसांचा बंदोबस्तात हलगर्जीपणा बाळगला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. अनिल विठ्ठल वेताळ आणि विशाल रामधन खरात अशी पळून गेलेल्या कोरोनाग्रस्त कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दोन्ही कैद्यांना ठेवण्यात आले होते. अनिल मूळचा कोरेगाव भीमा येथील रहिवाशी असून त्याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल आहे. त्यानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. विशाल निगडीतील रहिवाशी असून चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनाही तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. काल मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दोघेही कारागृहातून पसार झाले. गस्तीवरील कर्मचाऱ्यांना कैदी पळून जाण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी येरवडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून निगडी व शिक्रापूर पोलीसांना माहिती दिली आहे.

पोलिसांना नाही सुरक्षितेचे गांभीर्य

येरवडा पोलिसांसह कारागृह प्रशासनाला सुरक्षिततेबद्दल गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. यापुर्वीही तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून जाण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 16 जुलैला गंभीर गुन्ह्यातील 5 कैद्यांनी पळ काढला होता. त्यानंतर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधितांना अटक करण्यात आली होती. तात्पुरत्या कारागृहातून वारंवार कैदी पळून जाण्याच्या घटनेमुळे येरवडा पोलिसांच्या डोळ्यावरील झापड उघडणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तात्पुरत्या कारागृहातून दोन कैद्यांनी काल मध्यरात्री एकच्या सुमारास पलायन केले आहे. खिडकीचे गज काढून त्यांनी पळ काढल्याचे दिसून आले आहे. संबंधित कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाची बैठक झाली आहे. त्यानुसार लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले आहे. – अजय वाघमारे, पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या