नराधमांना तातडीने शिक्षा करण्याची बलात्कार पीडितेच्या बहिणीची मागणी, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

पाच नराधमांनी जिवंत जाळलेल्या उन्नाव बलात्कार पीडितेला ज्या ठिकाणी दफन करण्यात आले त्याच ठिकाणी प्रशासन मंगळवारी थडगे बांधत होते, परंतु या थडग्याच्या विटा बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांनी उखडून टाकल्या. तसेच आधी माझ्या बहिणीला न्याय द्या, तिला जिवंत जाळणार्‍या त्या नराधमांना तातडीने शिक्षा करा नाहीतर आत्मदहन करीन, असा इशाराच बलात्कारपीडितेच्या बहिणीने उत्तर प्रदेश सरकारला दिला. पाच नराधमांनी बलात्कारपीडितेला रेल्वे स्थानकाजवळ रॉकेल ओतून पेटवून दिले होते. 90 टक्के भाजलेल्या या ‘निर्भया’चा अखेर करुण अंत झाला. तिच्या कुटुंबीयांनी शेतातच दफन केले होते. हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर उन्नाव प्रकरणातही संपूर्ण देश पेटून उठला आहे.

जोपर्यंत माझ्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत थडगे बांधू देणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. बलात्कारपीडितेच्या कुटुंबीयांनीच त्या ठिकाणी थडगे बांधण्याची मागणी केली होती असा दावा बिहार पोलीस ठाण्याच्या विकास पांडेय यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवरच त्या ठिकाणी थडगे बांधण्यास प्रशासनाने सुरुवात केली होती, परंतु  तिच्या कुटुंबीयांचा रुद्रावतार पाहून थडगे बांधण्याचे काम थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी तिचे दफन करण्यात आले. पुन्हा तिला पेटताना पाहण्याची आमच्यात हिंमत नव्हती त्यामुळेच आम्ही तिचे दफन केले अशी काळीज पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया तिच्या बहिणीने दिली होती. दरम्यान, बलात्कारपीडितेच्या वडिलांनी सरकारी नोकरी, शस्त्र परवाना आणि निवासाची मागणी केली आहे. तिच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी खासदार अनू टंडन यांनी पाच लाख रुपये तर समाजवादी पक्षाने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

नेमके काय प्रकरण

उन्नाव जिह्यातील एका गावात राहणार्‍या 23 वर्षीय तरुणीला गुरुवारी पहाटे पाच नराधमांनी रेल्वे परिसरात पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. 90 टक्के भाजलेल्या या तरुणीला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. दरम्यान, आरोपींपैकी दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींपैकी एक असलेल्या शुभमच्या आईने या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याची मागणी केली आहे.

भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगरप्रकरणी 16 डिसेंबरला निर्णय

उन्नाव जिह्यातील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर आणि शशी सिंग यांच्यावर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात खटला सुरू आहे. या प्रकरणात येत्या 16 डिसेंबर रोजी कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2017 साली सेंगरने संबंधित तरुणीवर बलात्कार केला होता. तिचे अपहरण, तिच्यावर सामूहिक बलात्कार, तिच्या वडिलांना मारहाण आणि पोलीस कोठडीतच त्यांचा झालेला मृत्यू असे पाच गुन्हे सेंगरच्या विरोधात दाखल करण्यात आले आहेत.

हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर चेन्नई पोलिसांनी खास महाविद्यालयीन तरुणींसाठी एक ऍप तयार केले आहे. या तरुणीही संकटात असतील तेव्हा एका क्लिकवर काही मिनिटांतच पोलीस त्यांच्या मदतीला हजर होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या