
केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी आणलेल्या नवीन ‘अग्निपथ’ योजनेविरोधात पंजाब विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा ठराव मंजूर केला. या योजनेवरून मान यांनी भाजपवर सडकून टीका केली. ही योजना चांगली असेल तर भाजप नेत्यांनी सर्वात आधी आपल्या मुलांना ‘अग्निवीर’ करावे, असे मान यांनी हा ठराव पास करताना म्हटले आहे.
भगवंत मान लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून ही योजना मागे घेण्याची मागणी करणार आहेत. ‘अग्निपथ’ योजनेविरोधात ठरावाला भाजपच्या आमदारांनी तीव्र विरोध केला तर कॉग्रेस आणि अकाली दलाने या योजनेचे समर्थन केले. भगवंत मान यांनी याविषयी बोलताना सांगितले, ‘अग्निवीर’ या योजनेसाठी अभ्यास कधी पूर्ण करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सैन्याच्या एका हातात हत्यार आणि दुसऱया हातात पुस्तक देण्याची तयारी केली जात आहे. जवानाच्या निवृत्तीला तीन महिने शिल्लक असताना युद्ध सुरू झाले तर तो जवान युद्धात सहभागी होणार का, आणि जर तो जवान शहीद झाला तर त्याला कोणती सुविधाही मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. हा निर्णय सैन्यातील जवान, देशभक्ती आणि तरुणांच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचेही ते म्हणाले.

























































