पंजाब काँग्रेसमध्ये बंडखोरी? 25 आमदार दिल्लीत, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटात देश होरपळून निघत आहे. मात्र राजकारणाचाही जोर कमी होताना दिसत नाही. पंजाबमध्ये सध्या राजकीय संकंट दाट झालं आहे. पुढल्यावर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसमध्ये प्रचंड तणाव आहे. आता काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वालाच त्यामध्ये दखल द्यावी लागली आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून राज्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावणे पाठवण्यात आले आहे. तिथे सर्व आमदार, मंत्री एका त्रिसदस्यीय समितीच्या पॅनलची भेट घेणार आहे. या भेटीत ते आपल्या तक्रारी, सल्ले पॅनलसमोर ठेवतील.

जवळपास दोन डझन आमदार ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रधवा यांचा देखील समावेश आहे हे सारे पॅनेलची भेट घेणार आहे. निवडणुकीत काँग्रेसने दिलेली वचन पूर्ती न केल्याच्या तक्रारी असल्याचे सांगितले जात आहे. तर काँग्रेसच्या आमदारांनीच सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास दोन डझन आमदार मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित करत आहेत.

केंद्रीय नेतृत्त्वाने हे त्रिसदस्यीय पॅनल तयार केले असून त्याचे नेतृत्त्व हे हरीश रावत यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच मल्लिकार्जुन खडगे आणि जेपी अग्रवाल हे देखील यामध्ये सहभागी आहेत. सोमवार म्हणजेच आजपासूनच ही समिती एकेक करून साऱ्या आमदार आणि मंत्र्यांची भेट घेईल.

सोमवारी दोन डझन आमदारांसह चरणजीत सिंह चन्नी, सुखजिंदर सिंह रंधावा देखील पॅनलची भेट घेणार आहेत. नंतर मंगळवारी नवजोत सिंग सिद्धू, परगट सिंग यांची भेट घेतली जाईल. अमरिंदर सिंग यांच्या गटातील मानले जाणारे मनप्रीत बादल, साधू सिंग दिल्ली आले आहेत आणि ते देखील पॅनलची भेट घेणार आहेत.