‘मास्टर स्ट्रोक’ मोदी सरकारच्या वर्मी लागला, मीडियावर सुपर इमर्जन्सी

29

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘एबीपी न्यूज’वरील ‘मास्टर स्ट्रोक’ मोदी सरकारच्या वर्मी लागला असून सरकार घाबरल्याचे दिसून येत आहे. सरकारची चुकीची धोरणे आणि ठोकम्ठाक कारभाराविरोधात ‘आवाज’ उठवणाऱ्या मीडियावर पडद्याआडून ‘सुपर इमर्जन्सी’ सुरू झाली आहे. आपल्या सरकारमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढले, असे सांगणारा महिलांशी प्रचारी थाटाचा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवला होता. पण त्याची ‘पोलखोल’ केल्यानंतर ‘एबीपी न्यूज नेटकर्व’ या वृत्तवाहिनीला आपल्या काही ‘डॅशिंग’ मोहऱ्यांचा बळी द्यावा लागला आहे. कारण मोदी यांच्या कार्यक्रमातील दाव्याचे बिंग फोडल्याने केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री राजवर्धन सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

‘एबीपी न्यूज नेटवर्क’चे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी बुधवारी दिलेल्या राजीनाम्यापाठोपाठ ‘मास्टर स्ट्रोक’ या शोचे अँकर, ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनीही त्या वृत्तवाहिनीला आज रामराम ठोकला. वाजपेयी यांनी एबीपी न्यूज नेटवर्कमधील आपल्या सर्वच सहकाऱ्यांच्या भेटी घेऊन निरोप घेतला. त्यांना सर्व सहकाऱ्यांनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत नेऊन सोडत ‘गुडबाय’ केले. त्याक्षणी वातावरण दुःखभरीत आणि भावपूर्ण झाले होते, असे वाजपेयी यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले.

‘एबीपी न्यूज’वर हे चाललंय तरी काय? पुण्यप्रसून वाजपेयी यांचा शो रोज रात्री ब्लॉक केला जातो, अभिसार शर्माचा ‘माईक’ काढून घेतला जातोय, मिलिंद खांडेकर यांना राजीनामा द्यावा लागतोय ही अघोषित आणीबाणीच आहे. – विनोद कापडी, चित्रपट दिग्दर्शक

‘पोलखोल’चा वचपा काढला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात महिलांशी संवाद साधला होता. त्यात चंद्रमणी कौशिक या महिलेने आपले शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढल्याचे मोदी यांना सांगितले होते. आपण भातशेतीकडून सीताफळाच्या शेतीकडे वळलो, असे तिने सांगितले होते. पण त्यानंतर तीच महिला ‘एबीपी’वरील ‘मास्टर स्ट्रोक’ या शोमध्ये आली असता मोदी सरकारचे बिंग फुटले होते. दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांनी मला शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढल्याचे सांगण्यासाठी पाठवले होते, असे चंद्रमणी कौशिक हिने उघड केले होते.

अँकर अभिसार शर्मा यांचीही बोलती बंद
मिलिंद खांडेकर यांनी ‘एबीपी न्यूज नेटवर्क’च्या व्यवस्थापकीय संपादकपदाचा राजीनामा दिल्यापाठोपाठ त्या वृत्तवाहिनीने प्रख्यात अँकर अभिसार शर्मा यांची बोलती १५ दिवसांसाठी बंद करून टाकली आहे. त्यांच्या हातातील ‘माईक’ काढून घेण्यात आल्यामुळे ही तर मोदी सरकारची अघोषित आणीबाणीच आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत. अभिसार शर्मा हे मोदी सरकारच्या धोरणांना आक्रमकपणे विरोध करत असत. एबीपी न्यूज नेटवर्कने त्यांची बोलती बंद करून टाकल्याने मोदी सरकार आपल्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे असा सूर सर्वत्र निघत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या