देशात मुंबईकरांना मिळते सर्वात शुद्ध पाणी

चांगले शिक्षण, आरोग्यव्यवस्था यासह नागरिकांना अनेक बाबतीत अव्वल असलेली मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यातही देशात अव्वल ठरली आहे. केंद्रीय विज्ञान आणि पर्यावरण खात्याने ‘एन्व्हारमेंट सर्व्हे रिपोर्ट-2020’नुसार मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम तर आहेच पण सर्वात जास्त शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यातही ती आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. पालिकेकडून सोसायटी, इमारती, चाळी तसेच झोपडपट्ट्यांचा भाग यातही स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा केला जातो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासह विविध सोयीसुविधा पुरवत असते. यात पाण्यासारख्या मूलभूत सुविधेचाही समावेश आहे. मुंबईकरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पालिका सर्वोतोपरी खबरदारी घेत असते. मुंबईत एकूण पाणीपुरवठयापैकी केवळ 0.7 टक्के पाणी हे अशुद्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुद्ध पाण्याची व्याख्या करताना एकूण पाणीपुरवठयापैकी 5 टक्के पाणी हे अशुद्ध असल्यास ते पिण्यायोग्य ठरवले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पालिकेच्या स्वच्छ आणि शुद्ध पाण्याच्या प्रमाणात उत्तरोत्तर वाढ होत आहे. दरम्यान, मुंबई हवेच्या प्रदूषणात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. या आधी नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारच्या ‘ब्युरो ऑफइंडियन स्टॅडर्ड’ने घेतलेल्या देशव्यापी पाण्याच्या नमुन्यात मुंबईचे पाणी देशभरात स्वच्छ आणि शुद्ध असल्याचे आढळले होते.

केंद्राच्या ‘इन्व्हारमेंट सर्व्हे रिपोर्ट’ने केले शिक्कामोर्तब, प्रत्येक तासाला शुद्धता तपासली जाते!

मुंबई महानगरपालिका नेहमीच पाण्याच्या शुद्धतेबाबत अगदी जबाबदारीने आणि काटेकोरपणे काम करत आली आहे. यात भांडुप जलप्रकल्प, पांजरपोळ, तुळशी, विहार यासह 27 तलाव आणि 350 केंद्रांमधून शुद्धतेचे नमुने वेळोवेळी घेतले जातात. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सात प्रमुख तलावांच्या पाण्याचे शुद्धता दर एक तासाने तपासली जाते. त्याचबरोबर वॉर्ड स्तरावर पाण्यातील क्लोरीनचे प्रमाणही तपासले जाते. हे प्रमाण प्रमाणित केलेल्या स्तरापेक्षा कमी आढळले तर त्यात क्लोरीनची मात्रा वाढवून ते प्रमाण योग्य केले जाते, अशी माहिती जल अभियंता खात्यातील एका अधिकाऱयाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या