पुष्कराज कीर्तनात दंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या सदाबहार अभिनयाने मालिका, चित्रपटांमध्ये आपली वेगळी छाप सोडणारा अभिनेता पुष्कराज चिरपूटकर आता कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेऊन कीर्तनात दंग दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याचा हा विठ्ठलनामाचा गजर ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या कार्यक्रमासाठी असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कराज करणार आहे.

वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव व संतपरंपरा जवळून जाणून घेण्याची संधी मला मिळाली, असे पुष्कराज म्हणाला. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या ‘आषाढवारी विशेष’ कीर्तन मालिके अंतर्गत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रंगणार आहे. रविवार 4 जुलैपासून सुरू झालेला हा कार्यक्रम दररोज सायंकाळी 6 वाजता पहाता येईल. नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे.