
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
एरवी अजगराच्या विळख्यात कुणी सापडला तर त्याची सहीसलामत सुटका होण्याची शक्यता फारच कमी असते. मात्र चंद्रपूरमध्ये एक अजगर असा काही अडकला, की त्याची सुटण्याची धडपड बघून कुणालाही त्याची दया येईल. एका घरात ८ ते १० फुट लांबीचा भला मोठा अजगर स्वयंपाक घरातील कढईच्या कानात अडकला होता. शेवटी सर्पमित्र आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या कढईचे कान कापून अजगराची सुटका केली.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील जंगल भागात तुलारमेंढा गाव आहे. तुलारमेंढा गावात राहणाऱ्या राजू नखाते यांच्या घरातील स्वयंपाकघरात हा अजगर पहाटेच्या सुमारास आला होता. स्वयंपाक घरातून भांड्यांचा आवाज येऊ लागल्याने घरातील मंडळी जागी होऊन बघतात तर काय, कढईला पकडण्यासाठी असलेल्या दोनही कानात हा भलामोठा अजगर अडकल्याचे लक्षात आले. अजगर कढईच्या कानामध्ये असा काही अडकला की त्याला बाहेर पडता येत नव्हते. पहाटेपासूनच ही बातमी वाऱ्याच्या वेगाने गावभर पसरली. योवेळी नागरिकांनी याची माहिती परिसरातील सर्पमित्रांना आणि वनविभागाला दिली आणि त्यांनी या अजगराला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र अजगर काही कढईच्या कानातून बाहेर निघत नव्हता. अखेर या कढईचे दोन्ही कान कापून अजगराची सुटका करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुटका करण्यात आलेल्या या अजगराला जंगलात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.






























































