कतारच्या न्यायालयाने हिंदुस्थानच्या नौदलाचे माजी कमांडर पूर्णेंदू तिवारी यांचा जामीन अर्ज फेटाळला, कुटुंबाची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
qatar cassation court rejects bail for navy veteran purnendu tiwari

कतारमध्ये आर्थिक प्रकरणात अडकलेले भारतीय नौदलाचे एकमेव माजी अधिकारी कमांडर पूर्णेंदू तिवारी यांचा जामीन अर्ज दोहा येथील सर्वोच्च न्यायालय (कॅसेशन कोर्ट) ने फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

‘फर्स्टपोस्ट’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पूर्णेंदू तिवारी यांच्या भगिनी मीतू भार्गव यांनी त्यांच्या प्रतिनिधीकडे व्यथा मांडली. ६५ वर्षीय तिवारी यांची प्रकृती तुरुंगात दिवसेंदिवस खालावत चालली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी हात जोडून पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांना विनंती करते की, माझ्या भावाला आणखी विलंब न करता हिंदुस्थानात परत आणावे. त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी पाहता त्यांना तुरुंगात ठेवणे त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते’, असे आवाहन भार्गव यांनी केले आहे.

आठ पैकी सात अधिकारी परतले, तिवारी मात्र अद्याप कतारमध्येच

२०२२ मध्ये हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली हिंदुस्थानी नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती. २०२३ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपानंतर अमीर (कतारचे प्रमुख) यांनी सर्वांची शिक्षा माफ केली. फेब्रुवारी २०२४ मध्ये आठपैकी सात अधिकारी सुखरूप भारतात परतले, परंतु कमांडर तिवारी यांना मात्र एका कथित आर्थिक प्रकरणामुळे कतारमध्येच थांबवण्यात आले.

‘दहरा ग्लोबल’च्या सीईओवर गंभीर आरोप

मीतू भार्गव यांनी असा आरोप केला आहे की, ‘दहरा ग्लोबल’ कंपनीच्या सीईओने आपल्या प्रभावाचा वापर करून संपूर्ण आर्थिक जबाबदारी कमांडर तिवारी यांच्यावर ढकलली आहे. तिवारी यांना एकांतात (Solitary Confinement) ठेवून जबरदस्तीने काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. गेल्या चार वर्षांपासून तिवारी दोहामध्ये आहेत आणि मागील दोन महिन्यांपासून ते पुन्हा तुरुंगात आहेत.

या संवेदनशील प्रकरणात हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालय आणि दोहा येथील हिंदुस्थानी दूतावासाकडून अधिकृत प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

qatar cassation court rejects bail for navy veteran purnendu tiwari

the cassation court in doha has rejected the bail plea of indian navy veteran purnendu tiwari. his family has urged pm modi to intervene for his safe return.