हिंदुस्थानने जिंकली कतारवासीयांची मने, आशिया चॅम्पियनला गोलशून्य बरोबरीत रोखले

फिफा रँकिंगमध्ये 103 व्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानने 62 व्या स्थानावर असलेल्या आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्य बरोबरीत रोखत फिफा 2022 फुटबॉल वर्ल्ड कप पात्रता फेरीत आपली धमक दाखवली. यजमान संघ कतारला बरोबरीत रोखल्यानंतर हिंदुस्थानी संघातील खेळाडूंच्या खेळाचे स्टेडियममध्ये उपस्थित फुटबॉलप्रेमींकडून कौतुक करण्यात आले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमींना त्यांच्या शानदार खेळाची पोचपावती दिली. स्टार आणि अनुभवी खेळाडू सुनील छेत्री नसतानाही हिंदुस्थानी संघाने जबरदस्त कामगिरी करून दाखवली हे विशेष. नवीन मुख्य प्रशिक्षक आयगोर स्टायमॅक यांनी या संघात चार बदल करीत आपला ‘फंडा’ अमलात आणला. याचा हिंदुस्थानी संघाला फायदा झाला.

कोलकातामधील लढत हाऊसफुल्ल व्हावी – स्टायमॅक

हिंदुस्थान-बांगलादेश यांच्यामध्ये 15 ऑक्टोबरला आता पुढील लढत रंगणार आहे. आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर आता कोलकातामधील लढत पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींची पावले स्टेडियमकडे वळायला हवीत. स्टेडियमबाहेर हाऊसफुल्ल बोर्ड झळकायला हवा, असा विश्वास हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक आयगोर स्टायमॅक यांनी यावेळी व्यक्त केला.

ओमानविरुद्धच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर कतारविरुद्धच्या लढतीआधी हिंदुस्थानी खेळाडूंच्या फिटनेसवरही शंका घेण्यात आली, मात्र या लढतीत अखेरच्या क्षणांपर्यंत हिंदुस्थानी संघातील खेळाडूंनी कतारच्या खेळाडूंना कडवी झुंज दिली. माझ्या फुटबॉलपटूंनी फिटनेस क्षमता दाखवून दिली, असे स्पष्ट मत आयगोर स्टायमॅक यांनी व्यक्त केले.

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू सुनील छेत्री याने आपल्या संघाची स्तुती केली. त्याने सोशल साइटवर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, ‘प्रिय हिंदुस्थान, हा माझा संघ असून हे माझे खेळाडू आहेत. हिंदुस्थानी संघाने केलेल्या कामगिरीचे शब्दांत वर्णन करू शकत नाही. मला या कामगिरीबाबत अभिमान आहे. निकाल मनाजोगता लागला नसला तरी संघाने दिलेल्या कडव्या झुंजीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कोचिंग स्टाफने केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या