जिंकेल तो फायनलमध्ये अन् हरेल तो घरी! मुंबई-गुजरात संघांमध्ये आज क्वालिफायर-2 लढत

विक्रमी पाचवेळा आयपीएलचा करंडक जिंकणारा मुंबई इंडियन्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स हे दोन तुल्यबळ संघ उद्या शुक्रवार, 26 मे रोजी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर-2 लढतीत भिडतील. क्वालिफायर-2 म्हणजे जिंकेल तो संघ फायनलमध्ये धडक देणार, तर हरणाऱया संघाला बॅगा भरून घरी जावे लागणार. स्टार खेळाडूंनी सजलेल्या उभय संघांमध्ये शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱया ‘जिंका किंवा मरा’ लढतीत कोण बाजी मारणार याबाबतची उत्पंठा आता टिपेला पोहोचली आहे.

क्वालिफायर-1 लढतीत चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभूत झालेला गुजरात टायटन्स अन् एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडविणारा मुंबई इंडियन्स यांच्यात ही क्वालिफायर-2 लढत  होणार आहे. मुंबईकडे पॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा असे अनेक मॅचविनर फलंदाज आहेत. कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन अशी दमदार सलामीची जोडी आहे, मात्र जसप्रीत बुमराह व जोफ्रा आर्चर यांच्या गैरहजेरीत या संघाचा गोलंदाजी ताफा म्हणावा तेवढा धारदार नाहीये. फलंदाजी आणि नशिबाच्या जोरावर मुंबईने क्वालिफायर-2 लढतीपर्यंत मजल मारलीय, मात्र एलिमिनेटर लढतीत मुंबईला चक्क गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी जिंकून दिले. उत्तराखंडचा आकाश मधवाल मागील दोन लढतींत मुंबईचा स्टार गोलंदाज बनला. त्याच्यासह अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावलावर खरी मुंबईची मदार असेल. जेसन बेहरेनडॉर्फ व ख्रिस जॉर्डन या वेगवान जोडगोळीलाही आता आपले योगदान द्यावे लागणार आहे.

उभय संघ    गुजरात टायटन्स हार्दिक पंडय़ा (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, राशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्जारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नलकांडे, जयंत यादव, आर. साई किशोर, नूर अहमद, दासुन शनाका, ओडियन स्मिथ, के. एस. भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा.

  •  मुंबई इंडियन्स रोहित शर्मा (कर्णधार), ख्रिस जॉर्डन, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पीयूष चावला, टीम डेव्हिड, राघव गोयल, पॅमेरून ग्रीन, ईशान किशन, डुआन जानसेन, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, संदीप वारियर, ऋतिक शौकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव.

 गुजरातवर सर्वोत्तम कामगिरीचे दडपण

गुजरात टायटन्स साखळी फेरीत अव्वल स्थानी राहिला असला तरी क्लालिफायर-1 लढतीत चेन्नईच्या गोलंदाजीपुढे गुजरातच्या फलंदाजांनी कच खाल्ली होती. त्यामुळे फॉर्ममध्ये परतलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी गुजरातवर दडपण असेल. शुभमन गिल व विजय शंकर यांनी गुजरातसाठी आतापर्यंत सातत्यपूर्ण फलंदाजी केलीय. वृद्धिमान साहानेही यष्टीमागे व यष्टीपुढे समाधानकारक कामगिरी केलेली आहे. राहुल तेवतियाच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसतोय. याचबरोबर कर्णधार हार्दिक पंडय़ाचा खराब फॉर्म व मधल्या फळीतील डेव्हिड मिलरचे अपयश गुजरातसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र मोहम्मद शमी व राशिद खान हे गोलंदाज गुजरातसाठी तारणहार ठरत आहेत. राशिदने तर फलंदाजीतही चमकदार कामगिरी केलीय. नूर अहमद व मोहित शर्मा यांनीही गोलंदाजीत योगदान दिले आहे. मुंबई व गुजरात या दोन्ही संघांनी एकमेकाविरुद्ध 1-1 विजय मिळविलाय, मात्र आता नॉकआऊट लढतीत कोण बाजी मारणार यासाठी उद्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे.