
सिडनी ते लंडन या दोन शहरांतील थेट विमान सेवा 2027 पासून सुरू होणार आहे. क्वांटास एअरवेज कंपनी प्रोजेक्ट सनराईज या मोहिमेद्वारे ही विमान सेवा सुरू करणार आहे. जगातील सर्वात लांब असलेली नॉन स्टॉप विमान सेवा असून या दोन शहरांतील 17 हजार 800 किलोमीटरचे अंतर अवघ्या 20 तासांत पूर्ण केले जाणार आहे. हे विमान लांब उड्डाणांसाठी बनवण्यात आले आहे. प्रत्येक विमानातून 238 प्रवासी प्रवास करू शकतील. विमानात फर्स्ट, बिझनेस, प्रीमियम इकोनॉमी आणि इकोनॉमी क्लास असतील. यातील खास वैशिष्टय़े म्हणजे 40 टक्क्यांहून अधिक जागा या प्रीमियमसाठी राखीव ठेवल्या जातील. क्वांटास या मार्गावर दररोज विमान सेवा देण्यासाठी कमीत कमी तीन एअरबस ए350-1000 विमान तैनात करेल. विमानांची डिलिव्हरी 2026 च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. डिलिव्हरीत उशीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन क्वांटासने 2027 पासून प्रोजेक्ट सनराईज लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. अल्ट्रा लाँग हॉल उड्डाणासाठी खूप खर्च येतो. नॉन स्टॉप उड्डाणासाठी जास्त इंधनाची गरज पडते. त्यामुळे कांटास जास्त इंधन बचत करणाऱया विमानांचा वापर करणार आहे.
कोणत्या सुविधा मिळणार
या विमानात फर्स्ट क्लास प्रवाशांना एक वेगळी केबिन मिळेल. यात 32 इंचाचा स्क्रीन, एक अलमारी, एक बेड आणि एक आरामदायक खुर्ची मिळेल. प्रीमियम इकोनॉमी आणि इकोनॉमी क्लासच्या प्रवाशांना लेगरूम आरामदायक सीट मिळतील. बिझनेस क्लासच्या प्रवाशांना आरामदायक खुर्ची मिळेल. लांब पल्ल्याच्या हवाई प्रवासासाठी एक खास वेलबीइंग झोन असेल. या ठिकाणी प्रवासी फिरू शकतील, स्ट्रेचिंग करू शकतील तसेच फ्रेश होऊ शकतील.