>> देवेंद्र भोगले
कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरातील रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेतील ढिसाळपणा चव्हाटय़ावर आला आहे. मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांची सुरक्षा तर वाऱ्यावर आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण अर्धेअधिक बंद आहेत. विशेष म्हणजे अंधाऱ्या मार्गांवरील आणि संवेदनशील विभागांमधील कॅमेरे फक्त शोपीस म्हणूनच आहेत. कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंगच होत नसल्याने इतके कॅमेरे बंद असल्याचे खुद्द सुरक्षा रक्षकांनाही माहीत नाही.
रुग्णालयाच्या आवारात 667 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु त्यातील 150 कॅमेरे बंद आहेत. रुग्णालय आणि वसतिगृहे यादरम्यानच्या मार्गावरील सुरक्षा कॅमेरे नादुरुस्त अवस्थेत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची सातत्याने वर्दळ असलेल्या आपत्कालीन विभागातील सीसीटीव्ही फक्त शोसाठी आहे. त्यात काहीच रेकॉर्ड होत नाही, अशी माहिती एका निवासी डॉक्टरने दिली. आयसीयू, सीसीयूमध्ये डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना अधिक घडतात, पण त्या भागात कॅमेऱ्यांची संख्या नगण्य आहे. डॉक्टरांच्या जागा वाढवताना सरकारने त्या प्रमाणात सोयिसुविधाही वाढवायला हव्यात असे निवासी डॉक्टर सांगतात.
एक हजार परिचारिका जे. जे.मध्ये आहेत, परंतु नर्सिंग हॉस्टेलचीही भीषण स्थिती आहे. जे. जे. रुग्णालय आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मिळून 179 सुरक्षा रक्षकांवर इतक्या मोठय़ा कॅम्पसच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, परंतु तेसुद्धा तीन पाळय़ांमध्ये असल्याने त्यांची संख्या कमी पडते.
बारा बाय बाराच्या खुराडय़ात चार भावी डॉक्टरांची घुसमट
जे. जे. रुग्णालयात एक हजार निवासी डॉक्टर्स आहेत, पण त्यांना राहण्यासाठी वसतिगृहात फक्त 400 खोल्या आहेत. त्यासुद्धा फक्त 12 बाय 12 चौरस फुटांच्या. त्यामुळे एकेका खोलीत चार-चार डॉक्टरांना खुराडय़ासारखे रहावे लागत आहे. जे. जे. रुग्णालय 48 एकर विस्तीर्ण जागेत पसरले आहे. निवासी डॉक्टरांच्या जागा वर्षानुवर्षे वाढत गेल्या, पण नवीन वसतिगृहे न झाल्याने डॉक्टरांची घुसमट होत असल्याची व्यथा निवासी डॉक्टरांनी मांडली.
डॉक्टरांना संवाद कौशल्य आणि स्वसंरक्षणाचे धडे देणार
कोलकात्यातील घटना घडण्यापूर्वी दोन दिवस आधीच रुग्णालयाची सुरक्षा समिती, पोलीस आणि ‘निर्भया’ पथकाची बैठक आम्ही घेतली होती. त्यात रुग्णालयातील 11 संवेदनशील जागा निश्चित करण्यात आल्या. तिथे रोज पोलीस भेट देऊन सुरक्षेची खातरजमा करणार आहेत. दीडशे सीसीटीव्हीमध्ये साधारण दुरुस्तीची आवश्यकता आहे ती करण्यात येईल. अलार्म सिस्टम नवी लावण्यात येईल. विशेष म्हणजे डॉक्टरांना रुग्णालयातून थेट वसतिगृहात जाता येईल, एका इमारतीमधून बाहेर न पडता दुसऱ्या इमारतीमध्ये जाता येईल अशी कनेक्टिव्हिटीही आम्ही करत आहोत. डॉक्टरांना तज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून संवाद कौशल्य शिकवण्यात येईल, तसेच स्वसंरक्षणाचेही धडे देण्याचा आमचा विचार आहे.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता