
महाराष्ट्राच्या कामगार चळवळीचे अर्ध्वयू आणि राज्यातल्या सतरा लाख सरकारी कर्मचाऱयांचे ज्येष्ठ कामगार नेते व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस रमाकांत गणेश ऊर्फ र. ग. कर्णिक (91) यांचे आज वृद्धापकाळाने वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने सरकारी कर्मचाऱयांचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामगार चळवळीतील अनेक नेते व कामगार उपस्थित होते. र. ग. कर्णिक यांच्या पश्चात मुलगा, सून, विवाहित कन्या, जावई असा परिवार आहे.
तुटेपर्यंत ताणायचे नाही
कामगार नेते र. ग. कर्णिक यांनी तब्बल 52 वर्षे 17 लाख सरकारी कर्मचाऱयांच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजपर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांची राजवट त्यांनी जवळून पाहिली होती. कामगारांचा आवाज बनून त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या होत्या. 1970 आणि 1977 मध्ये कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचाऱयांचे दोन मोठे संप झाले होते. कामगारांच्या रास्त प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करायचा पण तुटेपर्यंत ताणायचे नाही, अशी त्यांची कामाची पद्धत होती. त्यामुळेच त्यांच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱयांचे अनेक प्रश्न मार्गी लागले.
विद्यार्थी दशेपासून चळवळीत
र. ग. कर्णिक यांचा जन्म 11 मार्च 1930 रोजी नाशिक येथे झाला. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी लोकसेना चळवळीत भाग घेतला.त्यांनी सुरुवातीला मुंबई मजदूर युनियन व बी. पी. टी. रेल्वेमेन्स युनियनमध्ये काम केले. सरकारी कर्मचाऱयांच्या संघटनेसाठी त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कार्यालयाला जागा दिली. 1962 मध्ये महाराष्ट्र सरकारी कर्मचारी संघटना स्थापन झाली. 1966 मध्ये पगारवाढ, महागाई भत्ता या मागण्यासाठी सरकारी कर्मचाऱयांनी संप केला. सर्व कामगारांनी एकत्रितपणे रजा टाकली होती. संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन यशस्वी झाले, त्यानंतर 1975मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकालातही महागाई भत्ता वाढवण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले, ही मागणी मान्य झाली. अशी अनेक आंदोलने र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली झाली. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंटचे ते अध्यक्ष होते. राज्य सरकारी कर्मचा-यांचे समर्थपणे नेतृत्व करुन सन्मानपूर्वक सेवा शर्ती आणि वेतनाचे लाभ मिळवून दिले आहे. 1991 पासून खाजगीकरण आणि पंत्राटीकरण विरोधात लढा उभारला होता.
हैदराबादवरून आल्यावर संघटना
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटना स्थापन करण्यासासाठी 1960मध्ये हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या परिषदेला र. ग. कर्णिक व त्यांचे सहकारी आवर्जुन उपस्थित राहिले. या परिषदेवरून परतताना कर्मचाऱयांच्यासाठी महाराष्ट्रव्यापी संघटना बांधण्याचा चंग बांधला. त्यानंतर पुढे मुंबईत 4, 5 व 6 नोव्हेंबर 1962 या काळात झालेल्या परिषदेत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लाँईज फेडरेशनची स्थापना झाली.
समाजभान जोपासणारा नेता, मुख्यमंत्र्यांची आदरांजली
कामगार-कर्मचारी चळवळीत न्याय्य हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखणे महत्त्वाचे असते असा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी र. ग. कर्णिक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली. संघटना पक्षातीत ठेवणे आणि गरज पडल्यास समाजाच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची शिकवण यापुढेही मार्गदर्शक ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.























































