प्रज्ञानंदाचा कार्लसनकडून पराभव

हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर आर. प्रज्ञानंदाचा नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत यजमान नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने आठव्या फेरीत पराभव करीत फिट्टमफाट केले. प्रज्ञानंदाने सातव्या फेरीत जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला होता, मात्र त्याला विजयाची लय राखता आली नाही. अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने बरोबरीनंतर आर्मागेडोनमध्ये (सडन डेथ) प्रज्ञानंदाचा पराभव केला. चीनच्या डिंग लिरेनला आठव्या फेरीतही अमेरिकेच्या फॅबियानो करूआनाकडून पराभव पत्करावा लागला. सहा खेळाडूंच्या या डबल राऊंड रॉबिन स्पर्धेत आता केवळ दोन फेऱया शिल्लक आहेत. सध्या कार्लसन 14.5 गुणांसह अव्वल स्थानी असून नाकामुरा 13.5 गुणांसह दुसऱया, तर प्रज्ञानंदा 12 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.

महिला गटात प्रज्ञानंदाची बहीण आर. वैशाली हिने सातव्या फेरीत अव्वल मानांकित युक्रेनच्या अन्ना मुजिचुक हिचा पराभव केला. वैशालीचा मुजिचुकवर हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय होय. क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्यानंतर वैशालीने सडन डेथमध्ये बाजी मारत दीड गुणांची कमाई केली. ती 11.5 गुणांसह संयुक्तपणे तिसऱया स्थानावर आहे.